ओबीसी आरक्षित जागेवर कुणबी समाजाचा देखील हक्क जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते-विलासबाबा जवळ

ओबीसी आरक्षित जागेवर कुणबी समाजाचा देखील हक्क जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते-विलासबाबा जवळ
मेढा.दि.16. सध्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, नगरपंचायत, निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. आरक्षण सोडत देखील पूर्ण झाली असून,नागरिकांचा मागास प्रवर्ग आरक्षित जागेवर आता कुणबी प्रमाणपत्र घेतलेल्या कुणबी समाजाचा देखील हक्क राहणार आहे.कुणबी व मराठा समाजाने एकसंघ होऊन आरक्षित जागेवर आपला दावा करावा असे आवाहन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व मराठा मोर्चा आंदोलक विलासबाबा जवळ यांनी केले आहे.
स्वातंत्र्य काळापासून नागरिकांचा मागास प्रवर्ग आरक्षण जागेवर मराठा समाज हा मतदान करीत आला आहे. मात्र मध्यंतरीच्या कालावधीत मराठा मोर्चामुळे महाराष्ट्रात सर्वत्र कुणबी प्रमाणपत्र अनेकांना प्राप्त झाली आहेत.कोकण विदर्भसह इतर विभागांमध्ये यापूर्वी कुणबी समाज हा नागरिकांचा मागास प्रवर्ग आरक्षित जागेवर निवडणूक लढवीत आला आहे. सातारा जिल्ह्यात कुणबी प्रमाणपत्र अनेकांना प्राप्त झालेली आहेत.यामध्ये जिल्ह्यातील जावळी तालुक्यामध्ये अनेकांनी कुणबी प्रमाणपत्र मिळवलेली आहेत. त्यामुळे हा समाज देखील नागरिकांचा मागास प्रवर्ग आरक्षणामध्ये निवडणूक लढवू शकतो.
तालुक्यातील कुडाळ व म्हसवे जिल्हा परिषद गट नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित झाला आहे. तर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलेसाठी आरक्षित आहे. त्यामुळे तालुक्यातील एकसंघ मराठा समाजाने कुणबी उमेदवार देऊन या ठिकाणाहून आपला उमेदवार निवडून आणावा असे आवाहन विलासबाबा जवळ यांनी केले आहे.
चौकट कुडाळ गटातील उमेदवार ठरू शकतो अध्यक्षपदाचा दावेदार
कुडाळ जिल्हा परिषद गटाचे आरक्षण नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलेसाठी राखीव झाले आहे. विशेष म्हणजे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पद देखील नागरिकांचा मागास प्रवर्गतील महिलेसाठी राखीव असल्याने या ठिकाणाहून निवडून जाणारा उमेदवार हा जिल्हा परिषद अध्यक्ष पदाचा दावेदार ठरू शकतो. त्यामुळे याठिकाणी उमेदवारी करण्यासाठी कुणबी समाजाने आता पुढे आले पाहिजे.



