सीएम देवेंद्र फडणवीसांचा थेट सातारा एसपींना फोन, बलात्कारी PSI गोपाल बदने निलंबित

सीएम देवेंद्र फडणवीसांचा थेट सातारा एसपींना फोन, बलात्कारी PSI गोपाल बदने निलंबित
सातारा.दि.२४.साताऱ्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या आत्महत्येच्या प्रकरणाने आता धक्कादायक वळण घेतले आहे. आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरने तिच्या हातावरच आत्महत्येचे कारण लिहिले असल्याचे समोर आले असून, त्यात दोन जणांवर लैंगिक अत्याचार आणि मानसिक छळाचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या धक्कादायक प्रकाराने संपूर्ण जिल्हा पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातारा जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून घेतली आहे. त्यांनी संबंधित पोलीस अधिकाऱ्याला तत्काळ निलंबित करण्याचे आदेश दिले असून, आरोपींवर कठोर कारवाई करण्याचेही निर्देश देण्यात आले आहे. यानंतर पोलिसांकडून गोपाळ बदनेचे तत्काळ निलंबन करण्यात आले आहे.

याबाबत सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोशी म्हणाले की, आम्ही या प्रकरणात गुन्हा दाखल केलेला आहे. एका आरोपीचे नाव पीएसआय गोपाल बदने आहे. तो फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचा आहे. दुसरा आरोपी प्रशांत बनकर आहे. तो पोलीस नसून तो सामान्य नागरिक आहे. या प्रकरणात आम्ही गोपाल बदने याला निलंबित करत आहोत. या दोघांना अटक करण्यासाठी पोलीस पथक रवाना करण्यात आलेले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कडक कारवाईच्या सूचना दिलेल्या आहेत. आरोपींना तात्काळ अटक करायची आणि जी काही कारवाई आहे ती करण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. त्यानुसार आम्ही तपास करत आहोत, अशी माहिती त्यांनी दिली आहे.



